गुरुवाणी हवी, गुरुबाजी नको
पुणे मेट्रो लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)
prasad.kulkarni65@gmail.com
सोमवार ता. ३ जुलै २०२३ रोजी गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा आहे.मानवी संस्कृती गुरुचे महत्व नेहमीच अन्यासाधरण राहिलेले आहे. जीवनात मार्गक्रमण करत असताना समस्यांना भिडण्यासह जीवन जगण्याची कला गुरु शिकवत असतात. भारतीय दर्शन परंपरेत आणि संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानलेले आहे. बालकाचे पहिले गुरु हे त्याचे आई-वडील असतात. मात्र त्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरु कारणीभूत ठरत असतो व प्रेरणादायी ठरत असतो. एक चांगला नागरिक बनवण्याचे काम गुरु आपल्या संस्कारातून करत असतात
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
अशी गुरुची व्याख्या भारतीय संस्कृतीने केलेली आहे.आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरूंच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा,त्यांच्यापुढे विनम्रतेने नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. कारण महाभारत लिहिणाऱ्या व्यासांचा जन्म या पौर्णिमेलाच झाला होता.
ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घे तू' असे व्यास ऋषी बद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
आज अनेकजण गुरुची माती सांगणारे लेख लिहितील.ते लिहिलेही गेले पाहिजेत या तीळमात्र शंका नाही.कारण शेवटी व्यक्ती घडवण्यामध्ये गुरु दिशादर्शक ठरत असतात. पण आजच्या वर्तमानात गुरुवाणी पेक्षा गुरुबाजी फार वाढलेली आहे. त्यातून सत्यार्थ प्रकाश मिळत नाही तर ढोंगबाजी दिसून येते. म्हणूनच आपल्या संतांनी या ढोंगीगुरुबाजी बाबत काय म्हटले आहे ते आज समजून घेण्याचा दिवस आहे. तोच खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचा संदेश ठरेल.
अध्यात्मिक आणि सामाजिक जीवनामध्ये आपल्याकडे गुरुसंस्था परंपरागत अस्तित्वात आहे. हे कार्य असाधारण अथवा दुर्लक्षित करण्यासारखे नाही. तरीही संताना मात्र गुरुबाजीतील अनिष्ट प्रकारांची चाहूल लागलेली होती. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ 'विवेकसिंधू 'पासून तुकारामांच्या अभंगापर्यंत भौंदूगिरीचा बुरखा फाडणारी अनेक उदाहरणे संत साहित्यात दिसून येतात.ढोंगी गुरुबाजी पासून दूर राहण्याचा संतांचा विचार आजच्या काळात जोपासणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण मोठमोठ्या राष्ट्रीय नेत्यापासून अगदी सर्वसामान्य कामगार वर्गापर्यंत अनेक जण या भोंदू गुरुजींच्या चक्रात गुरफटून गेले आहेत. जीवनाच्या इतर अंगापेक्षा पारंपारिक जीवनात चटकन प्रविष्ट होऊन आयुष्याचे सार्थक करू पाहणाऱ्या अनेक मंडळीत गुरूच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाने अथवा अन्य गोष्टींच्या देखाव्यामुळे भारावून जाण्याने गुरुच्या पात्रापात्रतेचा विचार करण्याची शक्ती नष्ट झालेली असते. त्यामुळे साधुत्वाचे बाह्य अवडंबर माजवून आपण कोणाचाही उद्धार करायला समर्थ आहोत असे ठामपणे (?) सांगणाऱ्या भोंदू गुरूंचा सुळसुळाट आज समाजात वाढलेला आहे. ही मंडळी सर्वसामान्य माणसाच्या श्रद्धेशी खेळत असतात आणि आपली दुकानदारी चालवत असतात. गावोगाव चालणाऱ्या सप्ताह आणि पारायणापासून टीव्हीच्या अनेक चॅनेल पर्यंत हे सर्वत्र दिसून येते. एकीकडे स्वयंघोषित गुरूंची संख्या वाढत आहे आणि दुसरीकडे सामाजिक बकालपण वाढत आहे.हे दोन्ही एकाच वेळी घडत आहे .अस्वस्थ वर्तमानाचे हेही एक कारण आहे.
संतवाङ्मयात सद्गुरु म्हणजेच महामानव असे सांगितले गेले आहे. आद्य ग्रंथकार मुकुंदराज यांनी विवेकसिंधूत म्हटले आहे की, ज्याच्या ठायी समबुद्धीचा प्रकर्ष झाला आहे त्याला सद्गुरु म्हणावे. संत ज्ञानेश्वरांनी गुरुची योग्यता पासून घ्यावी असे सांगितले आहे. एकनाथांनी तर अशा भोंदू गुरुबाजांवर चांगलाच प्रहार केला आहे. केवळ काढाऊ वृत्ती, धनाचा लोभ आणि स्वतःचे स्तोम माजवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न हीच लक्षणे आजकालच्या तथाकथीत गुरूंमध्ये दिसत असतात.असे हे गुरु स्वतःच चंगळबाज असतात मग त्यांच्यापासून परमार्थ काय शिकणार ? लोभी गुरुपासून घडला तर पारमार्थिक अपघातच घडेल असे सांगताना एकनाथी भागवतात ते म्हणतात,
जे का अपेक्षूनिय वित्त , चतुवर्ण उपदेशीत
ते धनलोभे लोलुप पथ,नाही घेईजेत गुरुत्वे l
जेथ गुरूशिष्य सलोभता, तेथे शिष्याची बुडे विरक्तता
ऐशिया ठायी उपदेश घेता ,परमार्थता अपघात !!
असा परमार्थिक अपघात घडवणाऱ्या ढोंगी गुरुची हजेरी घेताना एकनाथ पुढे म्हणतात ,
अंगा लावूनिया राख, करी भलतेची पाप
मेळवी शिष्यांचा मेळा,अवघा भांगेचा घोटाळा,
नामा परी सांगे मंत्र ,नेणे विधी अपवित्र
नकळे ज्ञानाची हातवटी,सदा परदार रहाटी
एका जनार्दनी सोंग,तेथे नाही पांडुरंग !!
अंगाला राख फासून स्वतःला संन्याशी म्हणवून घेणारी अनेक ढोंगी मंडळी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन सर्वसामान्य माणसाला लुबाडत असतात हे एकनाथांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
एकनाथां प्रमाणेच संत नामदेवानीही भोंदू गुरुविरोधात लेखणी झिजवली आहे. जगाला सांगे ब्रह्मज्ञान ,आपण कोरडे पाषाण असणारे हे लोक टीपे टोपी माळा असली भक्ती शिकवतात. ही खोटी कर्मकांडी भक्ती म्हणजेच कांचनिक भक्ती आहे असे संत नामदेव म्हणतात.
कांचनिक भक्ती सर्वकाळ करी, बहुतांंचे वैरी हीत नेणें
लोकांपुढे सांगे आम्ही हरिभक्त,न होय विरक्त स्थिती त्याची !!
असे सांगून संत नामदेव एका अभंगात म्हणतात,
पोटासाठी जरी करी हरीकथा, जन रंजविता फिरतसे
तेणे केला घात एकोत्तर शतकूळाचा ,पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर,
द्रव्याचीये आशे हरिकथा करी ,तया यमपुरी नित्यवास
नामा म्हणे ऐसे होते जे रे कोणी, ते नर नयनी पाहू नये !!
संत तुकारामांनी तर अशा गुरूंबाबत ' मुखे सांगे ब्रह्मज्ञान ,जनलोकांची कापितो मान ' असेच म्हटले आहे .
तुकारामांनी अनेक अभंगातून या भोंदुंची चांगलीच रेवडी उडवली आहे. ते म्हणतात,
डोई वाढवले केश, भुते आणीती अंगास
तरी ते नव्हती संतजन ,तेथे नाही आत्मखुण,
मेळवून नरनारी, शकुन सांगती नानापरी
तुका म्हणे मैंद, नाही त्यापासी गोविंद
दया धर्म चित्ती नाही, ते जाणावे भोंदुजन !!
नशेबाजी आणि पोटासाठी चाललेली ही भोंदूगिरी आहे संत तुकाराम म्हणतात.
कली युगी घरोघरी, शब्द झाले फार
वितभर पोटासाठी, हिंडती दारोदार
.......ऐसे संत जाले कळी ,तोंडी तमाखूची नळी
स्नानसंध्या बुडविली , पुढे भांग वोडवली,
भांग भूर्का हे साधन,पची पडे मद्यपान
तुका म्हणे अवघे सोंग, तेथे पैसा पांडुरंग !!
भिकेचे डोहाळे लागलेले जुने लागीर वाणी असते असे संत तुकाराम म्हणतात. पोटासाठी गुरुबाजीचा बाजार मांडणारी मंडळी स्वतः अतिशय अज्ञानीअसतात मग त्यांच्याकडून दुसऱ्यांना ज्ञान काय मिळणार? अर्थ न कळणाऱ्या व नुसती घोकंपट्टी अथवा पोपटपंची करणाऱ्यांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात,
अर्थाविना पाठांतर कासया करावे, व्यर्थ ची मरावे घोकुनिया
घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे, अर्थरूप राहे होऊनिया
तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी, नाही तरी गोष्टी बोलू नका !!
तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनीही ढोंगी गुरूंच्या संदर्भात अनेक अभंग लिहिलेले आहेत.बहिणाबाई म्हणतात ,जे गुरु स्वतःच काम,क्रोध, लोभ, द्वेष यांच्या आहारी गेले आहेत ते इतरांना कसले मार्गदर्शन करणार ?ज्यांच्याकडे सदसदविवेक बुद्धी नाही ते इतरांना सुखी कसे ठेवणार ?जे स्वतःच मायेच्या मोहाने ग्रासले आहेत ते इतरांना या मोहपाशातून काय बाहेर काढणार ?
संतांनी असे ढोंगी गुरूबाजी वर कोरडे ओढलेले आहेत .तरीही या समाजात धनलोभी व स्वार्थी असे अनेक विषयासक्त गुरु संतवाणीचे प्रवचन ,कीर्तन आपल्या सोयीनुसार रंगवून सांगताना दिसतात.तसेच भोळ्या भक्तांना पारमार्थिक सुखाचे आमिष दाखवून ज्ञानेश्वरी पासून दासबोधापर्यंतच्या ग्रंथांची पारायणेही करून घेतात. ही पारायणे त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठीच असतात.संतवाङ्मयाचा आशय समजून न घेता आणि संतांच्या चळवळीचा अर्थ न समजल्याने या पारायणातून भक्तांच्याही हाती काही पडत नाही. संतांनी काय सांगितले आणि हे तथाकथित गुरु काय सांगत आहेत याचा विचार शिष्य,अनुयायी मंडळी करतच नाहीत.
ज्ञातेपणाचा आभास निर्माण करणारी ही ढोंग बाजी समाजाला लागलेली कीड आहे असे म्हणावे लागेल. अशी अनेक ज्ञातेपणाचा आव आणणारी माणसे संतवाणीचे स्वतःच्या बुद्धीनुसार निरूपण करून माऊली, सद्गुरु, महाराज वगैरे प्रकारची विशेषणा लावून समाजाचे शोषण करतांना दिसतात .त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. खरे गुरु आपला शिष्य सुद्धा परीक्षेतून पारखून घेतात.तर हे भोंदू गुरु दिसेल त्याला आपला शिष्य करायला स्वतःच धावतात. मारून मुटकुंन शिष्यत्व पत्करायला लावण्याचाच हा प्रकार आहे. असे गुरु एखाद्याची इच्छा नसली अथवा तो दुसऱ्या एखाद्याला गुरु मानत असला तरीही त्याच्यापेक्षा मीच कसा' पावरफुल्ल ' गुरु आहे असे सांगून आपला गंडा बांधण्याचा आग्रह धरतात .त्यामुळे गुरु करायचा असेल तर त्याची निवडही पात्रापात्रतेच्या विचारानेच केली पाहिजे. पूर्वी सरदारांच्या जवळ जसे त्यांचे हुजरे असत तसे या तथाकथित महाराजांजवळ त्यांची शिष्य मंडळी असतात.अशा एकूणच पार्श्वभूमीवर संतांनी आपल्या वाङ्मयातून ढोंगी गुरुबाजीवर हल्ला चढवला. त्यातून आपण कोणता बोध घ्यायचा आणि त्याचा प्रसार व प्रचार कसा करायचा याचा गांभीर्याने विचार करायला हवा. कारण आज अशा गुरूंचे रूप लाखोंच्या संख्येने असलेल्या बैरागी, गोसावी ,जोगी ,साधू ,साध्वी, योगी यांनी घेतलेलेआहे. हे लोक समाजात दारिद्र्य ,आळस ,अज्ञान आणि व्यसने यांची मोठ्या प्रमाणात वाढ करतात.तरीही लोक त्यांच्या आशीर्वाद मागत असतात. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवाणी आणि गुरुबाजी यातील फरक समजून घेण्याची नितांत गरज आहे.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)
Comments
Post a Comment